उदास वाटे मना रहाया, या भूमीवरती
(चाल: कसा निभवशी काळ..)
उदास वाटे मना रहाया, या भूमीवरती ।
शून्य दिसे जग तुजविण रामा ! नेत्र सदा झुरती॥धृo॥
जिवलग गेला वनी तरी का, सुखी राहि कांता ? ।
जरा न शांती तिला, तशी गत झाली मज आता ॥१॥
जिकडे पहावे तिकडे अवघे, दुःख दिसे डोळा ।
विषय सुखाला झुरती जन हे, सोडुनि घननीळा ॥२॥
पैसा पैसा करिता मरती, किति लक्ष्मीकांत ? ।
कांत म्हणावे तया कि बसले, सर्प धनावरतं ? ॥३॥
चोरी जारी सदा लबाडी, आवड जनलोका ।
कशी करु संगती सांग मज, मारु कुणा हाका ? ॥४॥
तुकड्यादासा विटले जग हे, जगास तो विटला ।
अपुल्या निज-धामा रामा ! पूर्ण पांग फिटला ।।५॥