भारतभूच्या पुण्य-पिठावरि कठिण प्रसंगावरी

(चाल: धन्य धन्य गे स्फूर्ति तन्मये...)
भारतभूच्या पुण्य-पिठावरि कठिण प्रसंगावरी ।
झळकला हिरा अंजनी - घरी ।।धृ०।।
प्रगटताच पोर्णिमे, धावला दिनकर घ्याया करी ।
पाडि अंधार दिगंतावरी ।।
कडकड कडकड करित गर्जना, गडबडले रिपु-अरी
कोण हा आला अवनीवरी ? ॥
(अंतरा) अति लाल धुरंधर ज्वाला नेत्रातुनी ।
चळचळे जसा वायूच अंबरीहुनी ।
खळबळे, पृथ्वि हालली जया पाहूनी ।
रामभक्ति साधण्या, कराया पालन आता पुरी ।
झळकला हिरा अंजनी - घरी ।।१।।
राम पाहण्या अधी रंगला, रामि मनापासुनी ।
भेटती राम तया येउनी ।।
राम-भक्ति करितसे निश्चये, नेम धरुनिया मनी ।
रंगला राम-कार्य घेउनी ॥
वीर तरुण हा खरा उडाला, राम वचन घेउनी ।
थडकला लंकेवरि जाउनी ।।
(अंतरा) भेटला रावणा सांग सीता म्हणउनी ।
लाविला ज्वाल लंकेस पेट देउनी ।
संहारी किती राक्षसा प्राण घेउनी ।
हृदय फाडुनी दावि दर्शना, राम पावले उरी ।
झळकला हिरा अंजनी - घरी ।।२।।
लक्ष्मणा वाचवी, आणुनी द्रोणागिरि धावुनी ।
शांतवी राम कार्य करवुनी ॥
दुःख न होवो प्रभुस अपुल्या, चिंती हृदयातूनी ।
धन्य हा भक्त सु-भक्तातुनी ॥
ब्रह्मचर्य-राहणी अखंडित, वीर-वृत्ति धडकुनी ।
भिये ना कोण्या रिपुला मनी ॥
(अंतरा) भेटवी सीता रामास खांदी बसवुनी ।
देववी राज्य विभिषणा भक्त म्हणउनी ।
रावणादि रिपु नमविले गर्व हरवुनी ।
काय कीर्ति सांगु या वीराची ? वाणि न चाले पुरी ।
झळकला हिरा अंजनी - घरी ॥३॥
रामकार्य साधण्या, आधिच्या आधी पळतो पुढे ।
पाहता शत्रु मनी धडधडे ।।
भारतभूच्या तरुण लेकरा ! घ्याया ऐसे धडे ।
करा हनुमंत ! कार्य एवढे ।।
स्फूर्ति द्यावि हिंदुच्या मनी, हरवुनी भेद वाकुडे ।।
वेळ जरि आली असली पुढे ।।
(अंतरा) मागणे नसे दूसरे, अम्हा मारुती ।
परि ठेवा मंदिर, रामाच्या मूरती ।
ही वेळ दिसे विपरीत, भ्रष्टवी मती ।
तुकड्यादास म्हणे वर दे, तव घडो भक्ति अंतरी ।
झळकला हिरा अंजनी - घरी ॥४॥