का दुसय्राचे पाहुनी सौख्य - उपहार

(चाल: कशी फिरलि हरीची..)
का दुसय्राचे पाहुनी  सौख्य - उपहार ।
कधि मिळेल ईश्वर ? सोडा हा निर्धार ॥धृ०॥
धनदारसुताच्या मोहार्णवी फसोनी ।
सोडिले आपुल्या मूळ घरावर पाणी ॥
संपत्ती, संतती याविण कोणि न जाणी ।
का जगात पाहता मीच अधिक मम राणी ।।
एकाहुन एक हि वीर श्रेष्ठ रण - धीर ।
परि न पाहिला त्वा ज्ञान- रुप- परिवार ।।१।।
मायिकी रीत ही द्वैति दुःख- उपचार ।
कधि न मिळे सुख त्या नरा, पावतो हार ।।
सोडनि थाट हा भजा गुरु साचार ।
पावाल भयकर भव-सागर हा पार ।।
तो करुणाकर सद्गुरुराज सुंदर ।
बसवील तुला  त्या  सौख्य  मंचकावर ।।२॥
व्हा उभे मृत्युच्या शिरी, धरुनि सामोरा ।
ती प्रगट करा अंतरिची जीवन- धारा ।।
उघडुनी नेत्र ज्ञानाचे सोडि संसारा ।
पहा विश्व ब्रह्मरुप डोळाभर परिवारा ।।
ऐकुनी धाव दुसऱ्याचि भक्तिच्या द्वारा ।
का मिळेल तुम्हा सौख्य ? पुसा सुविचारा ।|३।।
लावुनी अलक्षी लक्ष इंद्रिया पार ।
मी मिळविन ईश्वर साधा हा निर्धार ।।
व्हा उभे, मृत्युच्या भये नका पळु दुर ।
शमवा हे षड् रिपु, तरा  तरा  भव - पूर ।।४।।
कुणि नये साथि संगाति पिता अणि माता ।
काढिती घराबाहेरी धरुनी हाता  ।। 
प्राणावर व्हा रे ! स्वार, मौज का पाहता ?
हा मार्ग धरा, मग शारंगधर ये हाता ।।
आठवा आठवा, हरा भवाची चिंता ।
वर उडा, मारुनी   अज्ञाना  मतिवंता ! ।|५।।
धरुनिया आडकुजी-पदा भजा गुणवंता ।
मग क्षणात भवसागरी  तरालचि  अंता ।।
तो तुकड्या सांगे गूज, वेळ का खोता ?
मग अंतकाळि काळाघरि खाशिल गोता ।।
त्यागुनी क्षणिक हा रंग भजा रघुवीर ।
कधि मिळेल ईश्वर ? सोडा हा  निर्धार ।।६।।