भवपुरी नाव तारण्या गुरु नावाडी

(चालः कशी फिरलि हरीची...)
भवपुरी नाव तारण्या गुरु नावाडी ।
लावुनी संत-संगास भवातुनि काढी ।।धृ०।।
अजवरी बह तारिले शिष्य घनघोरी ।
मी काय वर्णु बा ! त्या सद्गुरुची थोरी ??
पाळुनी आपुले ब्रीद दुजाला   तारी ।
होतसे  भक्त - संकटी   पुरा   कैवारी ।।१।।
गुरु आडकोजी हा पुरा पुरा फुलवारी ।
जाहला प्रगट वरखेडि धर्म- संस्कारी ।।
आर्वीस घेउनी जन्म   नग्नरुप  धारी ।
बाहेरि पिशाचे रुप, आत अवतारी ।।
सोडिले मान-धन- श्रीमंतीवरपाणी ।
मारुनी लाथ वैभवा उघडिल्या खाणी ।।२।।
पाहताचि लाल संधान रत्न पाचोरी ।
जाहला स्थीर होउनी रुपी रुपवारी ।।
जगतात नग्नरुप धरीफिरे बाहेरी ।
नच अंगी कपडा कधी राहि तिळभरी ।।
भावना प्रगटवी लोकांच्या अंतरी ।
लखलखाट दृष्टी  कमलांकित   सुंदरी ।।३॥
ती दृष्टि फिरे ज्या स्थळी नृप तो करी ।
नच   उणे   तयाला   त्रैलोक्यामाझारी ।।
पायात पद्म - ध्वज- चक्रांकुश ही सारी ।
कर-कमलि चिन्ह ते धर्म-गदा अवधारी ।।
नासिका सरळ ती दृष्टि लवचिक भारी ।
जैसा कि प्रगटला हिरा - रत्न   अंधारी ।।४।।
त्या कुरळ्या केसावरी भ्रमर   रूंझारी ।
पाहताच मूर्ति ती हरे कामना सारी ।।
टाकुनी देह-अभिमान गर्व तो सोडी ।
रे ! जाइ शरण, गुरुराज भवातुनि काढी ।।
करुणेचा सागर भक्त-जनासी तारी ।
तुकड्यासि पार करि भवसागरि भय-हारी ।।५।।