बा सांग सद्गुरु ! कसा तरिन भवपुरी ?

(चाल: कशी फिरली हरीची...)
बा सांग सद्गुरु ! कसा तरिन भवपुरी ?
हा लोभ - काळ येउनी गांजितो उरी ।।धृ०।।
वासनाहि चांडाळिन जी  नाही  बरी ।
बुडविले हिने मम गृह-दार खरोखरी ।।
नच सोडि कुणाला, सर्व बांधिले करी ।
महा साधु-ऋषींची पाडि जटा भूवरी ।।१।।
राहती जरी महावनी, तपस्या - धारी ।
परि लोभाने फिरविले जगामाझारी ॥
लावुनी लंगोटी जी का साधन करी ।
सोडुनी भस्म, चंदनी साबु वापरी ।।
बहुज्ञानि मुरविले, काय मी गणना करी ?
अहो ! इंद्र-चंद्र मुरविले भवामाझारी ॥२।।
हटयोगि धरी हट्टास साधना करी ।
दाबुनी बुडविले नरक-कुंडि परोपरी ।।
मग ज्योतिष्याची काय कथा त्या घरी ?
त्यापुढे पुजेचा थाट काय तो करी ?
लावुनी नेत्र भर दोन प्रहर  भीतरी ।
बसताति समाधी लावुनि  शरिरांतरी ।|३॥
भूलविले तया लोभाने असे संसारी ।
तव दीन अभाग्याचि गा ! मात का पुरी ?
हा देह- अहंतेमुळे बुडालो हरी !
करुनी करुणा, दूर पाश हा करी ।।
तुकड्यादासा ठाव दे, अपुले चरणावरी ।
हो लोभ - काळ येउनी, गांजिती  उरी ॥४॥