पाहतात तरी का कोणी ? तुझि दैना केविलवाणी
(चालः ऊठ दे झुगारुनि बेडी...)
पाहतात तरी का कोणी ? तुझि दैना केविलवाणी । गायिगे ! ।|ध0॥
गेला तव रक्षक आता, श्रीकृष्ण जगाचा त्राता । गायिगे ! ।।
श्री दत्त गुप्त ते झाले, मज वाटे तुजवर रुसले । गायिगे ! |।
(अंतरा) शिव हरे, लाविले पुरे, नेत्र साजिरे,
बैसले ध्यानी, तुझि हाक घेइना कोणी । गायिगे ! ।|१।।
उरले हे हिंदूधर्मी, कृषिप्रधान देशी कर्मी । गायिगे ! ।।
त्यांचिया बुद्धिची गाणी, सांगतो ऐक गाऱ्हाणी । गायिगे ! ।।
अति स्वार्थ तयांना झाला, धर्माचा आदर गेला । गायिगे ! ।।
(अंतरा) दुर्मती, तुला काढती, बजारी किती,
विकति हौसेनी, कटि खोचति रुपये नाणी । गायिगे ! ||२||
नच जरुर तुझी लोकाला, वाटते असेची मजला । गायिगे ! ||
मग दूध कशाला देशी ? पुत्रासम सेवा करिशी। गायिगे ! ।।
किति गोड तुझा हा पान्हा, पाजशी दुष्ट लोकांना । गायिगे ! ।।
(अंतरा) किति प्रेम, तुझे हे नेम, अंतरी क्षेम,
क्रोध ना अणि, नच उदार तुजसा कोणी । गायिगे ! ।।३।।
किति सुंदर गोह्रे देशी, जुंपण्या अम्हा शेतीसी । गायिगे ! ।।
नच काहि मनी आणोनी, पुरविशी दही-दुध-लोणी । गायिगे ! ।।
दुष्टांना अणि सुष्टांना, अपुल्यांना अणि परक्यांना । गायिगे ! ।।
(अंतरा) ही कीव, घेति जरि देव, चुके तव भेव,
प्रार्थितो चरणी, तुकड्या हा करुणा-वाणी । गायिगे ! ।।४||