कुणि ही जादू चालविली हो । मनात माझ्या हुल भरली हो
(चाल : आम्ही क्रांतीचे वीरगडी हो..)
कुणि ही जादू चालविली हो ।
मनात माझ्या हुल भरली हो ऽऽ ।।धृ0।।
लगबग जावे प्रार्थनी वाटे ।
क्षणही न आता येथे कंठे ।।
ओढताण ही झाली जिवाची -
वृत्ती नसता कशी वळली हो ॥१।।
मोह मनाचा अंतरी लपला ।
असेल म्हणूनी कुणी फुलविला ।।
सुगंध आला मधुर फुलांचा -
ध्वनी गंभीर ये सुध हरली ॥२।।
जिव वेड्यापरी जाऊनी बसला ।
आसन लावूनी निजध्यानाला ।।
अनहद वेणू कर्णी पडता ।
तुकड्याची वृत्ती फुलली ॥३॥