आम्ही तत्त्वाचे गोसावी, परंपरा आम्हा नाही ।

(चाल: बनबनकी बनवासी रे...)
आम्ही तत्त्वाचे गोसावी, परंपरा आम्हा नाही ।
अधिकाराविण कोणी न साधू ! I|धृ०।।
भराभरा वाचुनिया पोथी, बहू केली पारायणे ।
लक्ष नसे एका वचनासी, काय म्हणोनी गाणे ?
म्हणोनी वाचावे थोडे, परि लक्षी असावा गोविंदु ! ।।१।।
एक जरी विद्वान निपजला, जात नसे विद्वानाची ।
शूर कोणी क्षत्रीय जन्मला, मुले न शोभती त्याची ।
ऐसे असता कसली गादी, उगीच धरावा हा   छंदू ।।२ |।
कर्तव्याने चमकती जे जन, तेचि शोभती श्रध्देला ।
उगीच पूजा करुनि कुणाची, कुचंबनाहि बुध्दीला ।।
तुकड्यादास म्हणे लागू द्या, जीवन उन्नतीचा नादू ।।३।।
                               -घुडनखापा दि. २९-0९-१९५९