या हो या सगळे भूपतिनो, धनिकांनो !
(चाल- हर हर बोलाना...)
या हो या सगळे भूपतिनो, धनिकांनो !
सुजन, जनांनो, गुणवंतांनो ! !
या हो या 0।।धृ0।।
गेले दिवस अता, व्यक्ति-सुखाचे मागे ।
सगळ्यां सुख व्हाया,करु जन-गण हे जागे ।
भेदाभेद अता, सोडुनिया बंधुंनो ! !
या हो या 0।।१।।
शेती जो कसतो, कष्टुनि अपुल्या हाते ।
भूमि त्याचि खरी, त्यासचि देऊ परते ।
भूमिदान करु, या पुढती श्रमिकांनो !
या हो या 0।।२॥
धन-गुण सगळ्यांना, वितरित करुनी देऊ ।
जो जे काम करी, त्यास कला ती वाहू ।
अपुले गावचि हे, राज्य करु मजूरांनो ! ।
या हो या 0।।३।।
कोणी सान नसे, थोर नसे सत्तेचा ।
अपुल्या कुवतीचा, हक्क असे सर्वांचा ।
तुकड्यादास म्हणे या सर्वचि पक्षांनो !
या हो या 0।।४।।
-बोधन, दि. १३-०७-१९५३