भूमिदान देउनी मोकळा हो बाबा ! अपुला चटकन्
(चाल : फटक्याची...)
भूमिदान देउनी मोकळा हो बाबा ! अपुला चटकन् |
काय भरवसा पुढिल काळचा, मानहानि होईल पटकन् ॥धृ०।।
कसेल त्याची जमिन म्हणती, तू श्रमतो का भूमिवरी ?
नाहितरी ही सोड मालकी, कर दुसरे उद्योग घरी ।।१।।
ऐनवेळि मग काहि सुचेना, ऊठ ऊठ अभ्यास करी ।
राष्ट्रासाठी धन दे सारे, खरी तुझी मग उजागरी ।।२।।
बसुनि खाणे जहरासम हे देश सर्व ओरड करतो ।
काम करा हो ! काम करा, हा नाद देशभर निनादतो ।।३॥
खरेच त्यांचे, म्हणणे आहे, कष्ट करी त्या भूमि नसे?
तुकड्यादास म्हणे हे लांछन, ठेवुनिया भागेल कसे ।।४।।
-मुंबई, दि. २८-०७-१९५३