कुणि दावा हो कुणि दावा हो
(चाल: जगदीशा जगत्पाला...)
कुणि दावा हो कुणि दावा हो, कुणि दावा राम विसावा हो ।।धृ0।।
बघता श्रमलो अनुदिनि त्याला, चैन नसे मन वांछि तयाला ।
त्याविण हृदयी रुतला भाला, विसर पडे निज-भावा हो ।।१।।
नेत्र तयाविण गळती सारे,कर्णि वि-वर्ण मलिनता मारे ।
शरिरी त्याचे भरले बारे, दास तया पदि न्यावा हो ।।२।।
काय मी चुकलो न कळे मला, सांगा कुणि तरि कळते ज्याला ।
सोडुनि प्रभु मज कैसा गेला ? तुकड्या तुकई लावा हो ।।३।।