कठिण गमे हा काळ जिवाला

(चाल: ठेवू कुणावर भार...)
कठिण गमे हा काळ जिवाला ।।धृ0।। 
सोडुनिया मज अंतरले प्रभु,विरह न साहे पळहि मनाला ।।१।।
सांगा कुणि तरि गोपाळांनो ! कुंजवनी प्रभु कवणा दिसला ?।।२।।
नेला हरवुनि गौळणिने का? नेतांना दिसला कि कुणाला ?।।३।।
घाबरली मम वृत्ति उदासी, वृक्षलतांनो तुम्हि मोहविला ? ।।४।।
तुकड्यादास म्हणे करु कैसे ? प्रभुविण जीव नुरेसा झाला ।।५।।