नसशिल ना झोपला तू, जाउनिया भूतळी ?

(चाल: शिणले हे नेत्र माझे...)
नसशिल ना झोपला तू , जाउनिया भूतळी ?
म्हणउनिया ऐकिना ही, दीनांची आरळी ।।धृ0।।
कीर्ती ही गाती गाणीं, शास्त्राला  वेढुनी ।
धावत   ये   चक्रपाणी !  गरुडासी   सोडुनी ।।१।।
कैवारी रंजल्यांचा  महती   ही कीर्तनी ।
का उरली वेळ काही, बघण्याची अजहुनी?।।२।।
भारत हा प्रीय माझा  म्हणसी त्या सुरगणी ।
संकटि मी धाव घाली गर्जविसी त्या म्हणी ।।३।।
द्रौपदिला वस्त्र देसी, लज्जा ही   राखण्या ।
अन्नान्नी भारत-भू ही, चिंधी ना  नेसण्या ।।४।।
परकीया हाक    मारू, स्वार्थाचे   भासती । 
निर्दयता पूर्ण ज्यांना, थोडी   ना   सन्मती ।।५।।
जातो का प्राण वाया? पडलीसे ही भिती ।
करु कैसे देवराया ! नावरते ही   स्थिती ।।६।।
ये, ये, ये, अजुनिया ये, बघण्यासी निर्बला ।
कंठी हा प्राण   वाहे, मंदमती   अवकळा ।।७।।
तुजविण या भारताची, धैर्यमती दुर्बळा ।
तुकड्यासी ठाव देई, सुखवी भू- मंडळा ।।८।।