नसावा लोभ दुष्टांचा, मित्र जरि
(चाल : अगर हे ग्यान को पावा...)
नसावा लोभ दुष्टांचा, मित्र जरि जाहला अपुला ।
असावा प्रेम थोरांचा, वैरि जरि भासला अपुला ।।धृ0।।
कुणी अति प्रेम दावोनी, कापताती गळा वेळी ।
फसे हा जीव त्या योगे, नासतो जन्म हा अपुला ।।१।।
कुणी अति वैरही दावी, आपुले सार्थकासाठी ।
परी तो वेळ साधोनी, कामि ये थोर तो अपुला ।।२।।
धरावा संग ऐशाचा, जिवासी सत्यता लाभे ।
म्हणे तुकड्या हरी-भजने,सुसंगी मोक्ष हा अपुला।।३।।