भाव - भक्ति हरीसी द्या हो ! माझा हरी

       (चाल: कशी मोहनि घातली...)
भाव-भक्ति हरीसी द्या हो ! माझा हरी विकतचि घ्या हो ! ।।धृ0।।
सर्व आहे तयाच्या पाशी, परि भावच लागे त्यासी ।
कुणि द्या हो, कुणितरी द्या हो ! । माझा  हरी0।।१।।
हरि वाट बघे कधिकाळा, कुणि देइल काय जिव्हाळा?
घ्या निरोप   अमुचा   जा   हो ! । माझा हरी0।।२।।
द्रोपदिने भक्ती केली, भर सभे वस्रे पुरविली ।
शास्त्रांचा    शोध   पहा   हो ! । माझा   हरी0 ।।३।।
तुकड्या म्हणे भक्ती भोळी, तो भेटतसे वनमाळी ।
ही    हाक   जना   सांगा   हो ! । माझा  हरी0 ।।४।।