दैव - गती ही न्यारी, बुद्धी काय करील बिचारी ?

(चाल: हे राष्ट्ररपिणी गंगे...)
दैव-गती ही न्यारी,बुद्धी काय करील बिचारी ? ।।धृ0।।
दानशूर हरिश्चंद्र वाहतो, पाणी डोंबा-द्वारी ।
श्रीकृष्णासम साह्य असोनी, पांडव फिरति भिकारी ।।बुद्धी0 ।।१।।
सती द्रौपदी दैवगतीने, ओढि सभेमाझारी ।
रामचंद्र प्रभु चौदा वर्षे, भ्रमति पहाडी खोरी ।। बुद्धी0।।२।।
कर्मगतीच्या अवघड मार्गे, वाहति सकल नर-नारी ।
तुकड्यादास म्हणे होणारे,न चुके देव-असूरी ।। बुद्धी0 ।।३।।