मन हे चकोर अमुचे , तू चंद्र भाविकाचा
(चाल: सबके लिये खुला हे...)
मन हे चकोर अमुचे, तू चंद्र भाविकाचा ।।धृ0।।
तव बोध वृत्ति लाभो, मन हे तुलाच पाहो ।
मुखी नाम-गुण गावो, हा प्रेम या जिवाचा ।।१।।
नच लालसा कुणाची, राज्यादिका धनाची ।
एक आस दर्शनाची, हा नेम या मनाचा ।।२।।
नेत्री तुलाच पहावे, पाहतेपणीच रहावे ।
तुकड्याची हाक घ्या ही, हा भाव अंतरीचा ।।३।।