का छळता दुसऱ्या धर्मा ? का यात मिळे प्रभू प्रेमा ?

(चाल: काया का पिंजरा डोले...) 
का छळता दुसऱ्या धर्मा? का यात मिळे प्रभु-प्रेमा ? ।।धृ0।।
जो कोणि भजे ज्या भावे ।
प्रभुराज    तयाला   पावे ।
हे शास्त्र आम्हाला ठावे ।
मग द्रोह येइ का कामा? का यात मिळे प्रभु-प्रेमा ? ।।१।।
कुणि  उभेच  भक्ती   करिती ।
कुणी ध्यान -समाधी धरिती ।
कुणि  नमाज  अपुले  पढती ।
तुम्हि त्यासि हसुनि निष्कामा, का यात मिळे प्रभु-प्रेमा? ।।२।।
कोणास येशु हा  गोड ।
कोणास साधुची चाड ।
कोणास   हरीचे  लाड ।
तुम्हि एकहि न करी नेमा, का यात मिळे प्रभु-प्रेमा ? ।।३।।
प्रभू सर्व जगाचा दाता ।
होतो  सर्वाचा    त्राता ।
पावतो विमलशा भक्ता ।
तुकड्या म्हणे सोडुनि वर्मा, का यात मिळे प्रभु-प्रेमा? ।।४।।