काय योग साधला ? जन्म तुला लाभला
(चाल: घटा घनघोर घोर...)
काय योग साधला ? जन्म तुला लाभला, कोण देव पावला ?।
बिचाऱ्या ! भजनासि लागला रे !।।धृ0।।
असशिल केले पुण्यदान त्वा,अथवा साधू सेवा ।
म्हणूनि कळले तुजला सखया, अंतरि देव भजावा ।
धर्म हाचि आपुला,कोणि तुला दाविला? कोण देव पावला? ।
बिचाऱ्या ! भजनासि लागला रे ! ।।१।।
कितितरी असंती लोक जगामधि, देव तया ना ठावे ।
खावे ल्यावे प्यावे ! सगळे म्हणती मरुनी जावे ।
तूच कसा त्रासला? नादि या उल्हासला? कोण देव पावला ?।
बिचाऱ्या ! भजनासि लागला रे ! ।।२।।
बाळपणी खेळाशि खेळती, तरुणपणी विषयाशी ।
वृध्दपणी मग जाति इंद्रिये, मार्ग दिसेना त्यासी ।
हेत कसा जाणला, अनुभवा आणला? कोण देव पावला ? ।
बिचाऱ्या ! भजनासि लागला रे ! ।।३।।
जाशि तमाशा, खाउनि मासा, पिउनी गांजा दारु ।
कोणी पुसेना त्यांना जगती, म्हणती मारु - मारु ।
तूच कसा वाचला-रंगणि या नाचला ? कोण देव पावला ?।
बिचाऱ्या ! भजनासि लागला रे ।।४।।
पूर्वीपासुनि असशिल केली, जोड तुवा पुण्याची ।
तुकड्यादास म्हणे, म्हणुनी तुज जोड मिळाली याची ।
नरदेह तारिला, जन्म हा उध्दारिला,कोण देव पावला?
बिचाऱ्या! भजनासि लागला रे! ।।५।।