देवावरती भार टाकुनी, भारतियांनो ! बसला का ?

(चाल :अवताराचे कार्य कराया...)
देवावरती भार टाकुनी, भारतीयांनो ! बसला का ?।।धृ0।।
कर्तव्याविण कोणाला तरि,लाभ मिळाला का जगती ? 
जी वस्तु मिळणेच नसे, त्यासाठी असला रुसला का ? ।।१।।
दैव असे ना देव असे, दुर्बल लोकांना  साथ   करी ।
उठा गड्यानो ! व्हा सावध, या अज्ञानांतरि फसला का? ।।२।।
कर्तव्याविण राहति जगति, जगणे त्यांचे योग्य नसे ।
राव-रंक वा साधु असो तो,असला का आणि नसला का ? ।।३।।
पूर्वज अपुले कार्य करोनी, जगता सुखवोनी गेले ।
काय अम्ही वंशज त्यांचे ! ऋण नाही म्हणोनि हसला का ? ।।४।।
तुकड्यादास म्हणे सत्कर्मा, देव-दैव होती साथी ।
करा करा निजकार्य अतातरि, भीतीने घरि घुसला का ? ।।५।।