माझ्या घरात पाहुणा आला
(चाल: तेरे द्दार खडा एक जोगी...)
माझ्या घरात पाहुणा आला ।
अन्न नसे तिळभरी खावया,जाऊनि मागु कुणाला ।।धृ0।।
शेजारीपाजारी पाहती, विचारपुस कोणी ना करती ।
दिसुनि दैना त्यांना ।
मानवतेचे नाते खुंटले, आपुलकीचे धागे तुटले,
पुसे न कोणि कुणाला ।।१।।
गाव कशाचे ?स्मशान सगळे,सहकार्याचे कुठे उमाळे ।
प्रसंग ऐसा आला ।।
प्रेमाने कोणी बोलेना, स्वार्थासाठी कष्टति नाना
नीती गेली लयाला ।।२।।
सांगा मग मी काय करावे ?, कसे जगावे आणि जगवावे ?
धर्म पारखा झाला ।।
तुकड्यादास म्हणे बघवेना, परस्परांची ऐसी दैना,
आता लाज प्रभूला ।।३।।