भेदभाव कशाला, माणसा माणसात रे ?
(चाल: मन मोह गयी रे प्यारी कुटिया...)
भेदभाव कशाला, माणसा माणसात रे ? ।।धृ0।।
अपुल्या समानचि प्रीती सर्वांना ।
अपुल्या जिवाचा मोह सर्वांना ।
हे नाते ओळखावे जीवनात रे ! माणसा-माणसात रे ।।१।।
तो एक करुनी सामान देतो ।
मी एक करूनी त्यासी पुरवितो ।
दोघांचा जीवनात दिसे हात रे ! माणसा-माणसात रे ।।२।।
दोघे मिळूनी जीवनास साजवी ।
दोघांचा संसार ऐक्याने दाखवी ।।
मग काय दाखवावी जात रे ! माणसा - माणसात रे ।।३।।
सकळासि कळू दे हा धर्म वेड्या ।
तोडोनि टाकी ह्या भेदांच्या बेड्या ।
तुकड्या म्हणे जुनी टाक कात रे ! माणसा-माणसातरे ।।४।।