काय पाहतोसी पराचिये दोष !

(चाल: मूर्त रुप सख्या श्रीपतीचे...)
काय पाहतोसी पराचिये दोष !
जरा शुध्द नाही आपुले मानस ।।धृ0।।
गुंडाळीत पाप जीवा भोवताली ।
कुणा ठावे ऐसी जन्मे किती झाली ।
अजूनिया नाही झालासी उदास ।
पुन्हा भोगावया दु:ख  गर्भवास ।।१।।
खंडन मंडन सदा चाले भांडण ।
यातून मुक्त व्हाया काय केले साधन ?
केले काय ऐसे कधी तरी साहस ?
विचारले  काय जावोनी संतास ? ।।२।।
माग माधुकरी संताचिये  दारी ।
जन्म-मरणाच्या चुकवाया फेरी ।
आत्मबोध व्हाया चाल सावकाश ।
तरि होई उध्दार,सांगे तुकड्यादास ।।३।।