माणूस द्या मज, माणूस द्या ही भीक मागता

(चाल: अवताराचे कार्य कराया...)
माणूस द्या मज, माणूस द्या ही भीक मागता प्रभु दिसला ।।धृ0।।
लोक दर्शनासाठी जाती, देव दिसावा म्हणुनीया ।
देव म्हणे मज माणुस न दिसे, अजब तमाशा हा असला ।।१।।
माणुस कसला हवा तुम्हाला? सांगा तरि मी शोध करी ।
तव बोले प्रभु केविलवाणा, कुटिल नको असला तसला ।।२।।
जंबुक, मेंढ्या, कुतरे, डुकरे, बहुत मिळे तरि काय करू ।
यांना शहाणे करण्यासाठी, मला हवा माणूस भला ।।३।।
हृदयाचा जो सरळ असे अणि ज्यावर सगळे लोभ करी ।
नम्र सदा सेवेला तत्पर, मोह न ज्या अपुला कसला ।।४।।
सकल लोक हे अपुले म्हणुनी, सर्वाकरिता प्रेम करी ।
तुकड्यादास म्हणे प्रभु मागे, असेल कोणी द्या त्याला ।।५।।