बसालास कशाला, आळशी बनायला ?
(चाल: भारताचा पोर तू...)
बसलास कशाला, आळशी बनायला ?
चाल पुढं देशाचं, काम करायला ।।धृ0।।
दिसायला धट्टा, शक्तीनं लठ्ठा ।
जेवायला पाहिजे, दही-दुध-मड्ठा ।
काय झालं शेतावर जायला ?
उगा मागतोस भीक, अरे ! काहीतरी शीक ।
अन् चाल पुढं देशाचं, काम करायला ।।१।।
बापाचा धंदा होता भिकेचा ।
तो काळ गेला मोफत जगायचा ।
काय झालं भिकारी व्हायला ?
लाज अता सोड तू कामाला धज तू ।
अन् चाल पुढं देशाचं, काम करायला ।।२।।
आपलं कमाव अन् आपणाला सुख दे ।
सगळ्यांच जीवन उद्योगी होउ दे ।
उगाच फिरु नको नासला ।
दास तुकड्या म्हणे, घेई ऐकून गाणे ।
अन् चाल पुढं देशाचं, काम करायला ।।३।।