कशी फिरली हरीची मर्जी अशा समयाला !

 ( चाल : हा पहि शब्द भांडार कलेचा...)
कशी फिरली हरीची मर्जी अशा समयाला !
नवरत्न जडिता लावुनी झुमका बनविला ।।धृ0।।
त्या झुमक्यासाठी एक महाल बनविला ।
चहुभवति आईने - काच लाविले त्याला ।।
आहे नवदरवाजे एकच खिडकी त्याला ।
त्या मंदिरात एक पेटी, कुलुप केले तिला ।।
त्या पेटीमध्ये झुमका तो ठेविला ।
घरदार कुटुंबाचे लोक मेळ मिळाला ।।
ते सर्वही मिळुनी येती, झुमका पहायाला ।
ते पाहूनि म्हणती अजब हरीची कला !
नवरत्न जडित 0।।१।।
मी बहु जोडिले आता इष्टमैतर ।
हा झुमका खेळायासी काढू सत्वर ।।
असे खेळता खेळता टपले चौघे चोर ।
कोणे दिवशी हो आफत येईल झुमक्यावर ।।
मौजेने मी खेळत होतो झुमका नीट ।
कडि उघडुनि धसले कसे चोर हे धीट ।।
भिरभिरा पाहती इष्टमित्र टकमक ।
कोणी जाउनि धरले नाही चोर झटपट ।।
जबरीने हो ओढुन झुमका माझा नेला !
नवरत्न जडित 0।।२।।
कशि संधि साधली अशा समयी   बरी ।
झाला सत्यानास ! चोरांवर आली मरी !!
झुमक्याची लागली हुरहुर माझ्या अंतरी ।
झुमक्याविण पडला अंधार सर्व मंदिरी ।।
बोले तो तुकड्यादास ज्ञान दे हरी !
नित्य चित्त बालकाचे चरणावरी ।।
मी अज्ञ असे कर सूज्ञ ईश्वरा ! मला ।
नवरत्न जडित 0।३।।