कुणास ठाऊक नाही असे ?

(चाल: नका विचारू देव, कसा ?. ..)
कुणास ठाउक नाही असे ?
तू   भक्तांचे   मनि  विलसे ।।धृ0।।
कोणाची तरी करशिल कामे ।
तुजला गमतची नाही रिकामे ! !
धुंडाळित तू राही सदाचा !
संकट    होईल   दूर   कसे ।।१।।
चोख्याची  ओढूनीया ढोरे ।
गोऱ्याची वाचदिली   पोरे ।।
जनी-संगे  दळणे   दळूनी ।
कबिराचे   घरि   विणीतसे ।।२।।
दामाजीची     हुंडी     देशी ।
तुकयासाठी अन्न पुरविशी ।।
एकनाथांच्या  घरचे  पाणी ।
पखाल    भरुनी   वाहतसे ।।३।।
आजहि भक्तांच्या संकष्टी ।
कोण दुजा येतो   जगजेठी ?
तुकड्यादासा तुझा भरवसा ।
घडी-घडी मज हेचि  दिसे ।।४।।
                    - गुरुकुंज आश्रम, दि. ०३ - ११ - १९५९