मंगल कर मंगल देवा

 ( चाल : डोळे मोडित राधा चाले...)
मंगल  कर  मंगल  देवा  ।
गणराया ! घे मम सेवा रे ! ।।धृ0।।
चंदन उटि लाविन तव माथी ।
धूप-दिपाची लाविन वाती ।।
अर्पिन तव पदी सुंदर दुर्वा ।
मंगल कर मंगल   देवा ! ।।१।।
रत्न मुकुट शिरि जडित कुंडले ।
कटी पितांबर कंकण सजले ।।
सुख वाटे ध्याता जिव भावा ।
मंगल  कर   मंगल  देवा ! ।।२।।
काय कमी तुज झाले म्हणोनी ।
सुखरुप नाही भारत जननी ।।
दे तिजला शांति - विसावा ।
मंगल  कर   मंगल  देवा ! ।।३।।
अन्न-वस्त्र दे, विद्या-बल दे ।
घरोघरी सुविचार शील दे ।।
तुकड्यादासा दे पदि ठावा ।
मंगल   कर  मंगल   देवा ! ।।४।।
                            - कोपरगांव, दि. १४ - ०९ - १९५९