कशाला काशी जातो रे बाबा !
(चाल: .काहेको तीरथ जाता रे भाई...)
कशाला काशी जातो रे बाबा ! कशाला पंढरी जातो ! ।।धृ0।।
संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो ।
कीर्तनी मान डोलवितो परी,कोंबडी,बकरी खातो !।१।
वडील जनाचे श्राध्द कराया, गंगेमाजी पिंड देतो ।
खोटा व्यापार जरा ना सोडी, देव कसा पावतो? ।।२।।
खांदी पताका,तुळसी गुळ्यामधे, घडी-घडी टाळ वाजवतो ।
गरीब-गुदांची दया ना चित्ती, दानासी हात आवरतो ! ।।३।।
झालेले मागे पाप धुवाया, गंगेत धावुनी न्हातो ।
तुकड्या म्हणे,सत्य-आचरणावाचोनी, कोणीच ना मुक्त होतो ।।४।।
- प्रवरानगर दि. १४-0९-१९५९