पाहिले का गुरुकुंज ? तुम्ही आजवरी !
(चाल: सुखे नांद सखेबाई...)
पाहिले का गुरुकुंज ? - तुम्ही आजवरी !
अभाग्यासी -भाग्य लाभे, जाता तोवरी हो ! ।।धृ0।।
महाद्वारि येता झणी, वाटे आलो तिर्थाटनी ।
भक्तिभाव दाटे नयनी, जशी पंढरी हो ।।१।।
स्वच्छ मार्ग न्याहाळीत, द्वारामागे द्वार येत ।
संत-बोध लिहिले वरती, जिवा उध्दरी हो ।।२।।
दिसे खुले सर्वांसाठी, देवद्वार घ्याया भेटी ।
संतवचने ही कंठी, अनुभवे पुरी हो ।।३।।
प्रपंच नि परमार्थाची जोड साधलीसे साची ।
दाटि नव्या मानवाची, लाभते खरी हो ।।४।।
सर्व तीर्थ, सर्व संत, प्रार्थनेच्या मंदिरात ।
आप दुजा नाही त्यात, भेद तिळभरी हो ।।५।।
सर्व मिळुनी करिती भक्ती,सर्व मिळूनची उन्नती ।
तुकड्या म्हणे सर्वाभुती, बोधती हरी हो ।।६।।