प्रभु रुसला, ऐसे म्हणता का ?
(राग: मिश्र काफी, ताल: तीन ताले )
प्रभु रुसला, ऐसे म्हणता का ?
आपणची दोषी नाही का ? ।।धृ0।।
हरिने गीता बोध दिला जो,
ऐकापुरता का होता तो ?
भारतवासी म्हणुनि बोलला ।
हे अजुनी कळले नाही का ? ।। प्रभु0 ।।१।।
तो म्हणतो अर्जुन व्हा सगळे,
विसरुनिया अंतरिचे काळे ।
गोपाळांनो ! या गोपिंनो,
हा तुमचा निश्चय आहे का ? प्रभु0 ।।२।।
प्रभु रुसला -! ऐसे बोलावे ।
मनमाने ती पाप करावे ।
केले तैसे कुणी भरावे ?
तुकड्यादास म्हणे,आम्ही का ? ।। प्रभु0।।३।।
- गुरुकुंज आश्रम, दि. 0७-१९-१९६१