माझे सुंदर जीवन पाहोनी
(चाल: तेरि प्यारी सूरतियाँ... )
माझे सुंदर जीवन पाहोनी, त्या प्रभुचि दया हो झणी
असे असु दै !
माझे अंतरपट तर निरखोनी,त्या प्रभूचि दया हो झणी
असे असु दे ! !.. ।।धृ0।।
ब्राह्म-मुहूर्ती उठतो मी,प्रभू स्मरण मनि करितो मी ।
स्नान करोनि ध्याना लागी, रोज मंदिरी बसतो मी ।।
माझे सुंदर जीवन0।।१।।
असत्य माझी वाणी नसे, मुफ्त कधी मी खात नसे ।
कष्ट करावे,तरिच जगावे याचा पाठचि करितो मी ।।
माझे सुंदर जीवन0।।२।।
वस्तु व्यवस्था साफ करी, घाण नसे मुळी दारी -घरी ।
दारावती फुले-वाटिका, श्रमदानाने काम करी ।।
माझे सुंदर जीवन0।।३।।
नम्र सदा मी जनतेला, कधी न झगडा मी केला ।
प्रेमळ राहावे सर्व जगासी, हे चिंतन मनि धरितो मी ।।
माझे सुंदर जीवन0।।४।।
सर्व असे जरि नित्य करी, सद्गुरुचा नच हात शिरी ।
तुकड्या सांगे, काम न रंगे, अनुभव हा हो संतजनी ।।
माझे सुंदर जीवन0।।५।।
- गुरुकुंज आश्रम, दि. 0१-११-१९६१