का म्हणता बाई ! फुकट घेतला ?
(चाल: विकत घेतला श्याम...)
का म्हणता बाई ! फुकट घेतला ?
दिला न काही दाम ।
उगिच का घरि आला घन:शाम ? ।।धृ0।।
अमोल जीवन सौंदर्याचे ।
लक्ष वेधिते तरि कितिकांचे ? ।
श्याम दर्शना जीवन दिधले -
स्वरुपि वाहिला काम ! ।।उगिच का0।।१।।
देहभान सगळे विसरोनी ।
तुच्छ जगाची लाज त्यजोनी ।।
वेडिपिसी त्यासाठि जाहले ,
किति हे तप निष्काम । उगिच का ? 0।।२।।
पति म्हणो दे डाकिण-शाकिण ।
सासू-सासरे वटति बोचुन ।।
खंत न धरता तिळ तयाची -
देह दिला प्रभु दान ! । उगिच का ? 0।।३।।
तुकड्यादास म्हणे ह्या गाठी ।
जन्मांतरिच्या असतिल भेटी ।
म्हणोनीच हा ये जगजेठी -
करण्या घरचे काम ! ।।उगिच का ?0।।४।।
-देवळी, दि. १४-११-१९६१