मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी

(चाल: विठ्ठल तो आला...)
मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी ।
सावळा मुरारी माझा सावळा   मुरारी ।।धृ0।।
तुळसिमाळ घेउनि हाती, निरांजनी धूपबत्ती ।
महाद्वार ओलांडले, पहावया   नेत्री   दिप्ति ।।
गाभाऱ्यात घंटा स्फुरला,नाद सर्व अंगी भरला ।
नेत्र उघडोनी बघतो, भावनाच दिसली   सारी ।।१।।
देव-देव म्हणती कोणा? भूक लागली या नयना ।
चहू बाजुनीया बघतो, देव पाहता दिसेना ।।
म्हणोनिया मागे फिरलो, द्वारी झोपडीत शिरलो ।
हसूनिया सांगे मजसी, रंजल्याची  सेवा  तारी ।।२।।
कोण बोललाहे बघतो, झोपडीत कामे करितो ।
बाजु ठेवुनिया बंसी, जनी सवे दळणे   दळितो ।।
चमकदार मुकुटावरती, धूर जंग बसली माती ।
पायी लागलासे तुकड्या, सुध बध गेली सारी ।।३।।
                                  - गुरुकुंज, दि. २६-0६-१९५४