आता वाजला रे ! डंका, घेऊ नको शंका
(चाल: सुनते थे नाम हम..)
आता वाजला रे ! डंका, घेऊ नको शंका,
हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।धृ0।।
डोक्यावर टोपली, हातात फावडे, मुखात नामघोष, देवासि आवडे ।
हेचि साधन आता साधले,कोणी सडका करी, कोणी बांधी विहिरी ।।
हे सुधरायला गांव सारे लोक लागले ।।१।।
आपलेच गांव आता तीर्थाचे स्थान, गावासि सुधराया देताति दान ।
याहूनि पुण्य नाही चांगले, सारे झाडझुड करी, स्वच्छ राहती घरी ।।
हे सुधरायला गांव सारे लोक लागले ।।२।।
मोठे जघीनदार भूदान देती, संपत्तिदानाची ऐसीच रीति ।
भूमिहीन नाही राहिले, कष्टी लहान थोर, श्रम करुनि फार ।।
हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।३।।
गरिबाची झोपडी बघताची मोडली, सर्व तरुणांनी सुधारोनि जोडली ।
सौंदर्य सजवोनि आणले, दास तुकड्या म्हणे, हेचि गाती गाणे ।।
हे सुधरायला गाव सारे लोक लागले ।।४।।
- गुरुकुंज, दि. १२-0८-१९५४