येउ दे दया आता तरी गुरुमाउली !
(चाल : तू गुपित कुणाला सांगु..)
येउ दे दया आता तरी गुरुमाउली !
या आयुष्याची दोरे कमी जाहली ।।धृ0।।
लागला श्वास-खरखरा ।
जीव होतो हा धाबरा ।
वासना तुझ्या दर्शनातची राहिली । या आयुष्याची0।।१।।
हा जन्म तुला अर्पिला ।
हे नको सांगणे तुला ।
तू साक्षि जगाची, कीर्ति तुझी ऐकिली । या आयुष्याची0।।२।।
बस सेवा दे आखरी ।
तवा नाम जपे वैखरी ।
तुकड्या म्हणे चिंता-चिता तुला वाहिली । या आयुष्याची 0।।३।।
- श्रीगुरुदेव मासिक - जून १९५५