देवाने धनवान तुला रे, गर्वासाठी केला का ?

(चाल: कुणि कृष्ण पाहिला का माझा...)
देवाने धनवान तुला रे, गर्वांसाठी केला का?
आयुष्याचा नाश कराया, नर-जन्मी या आला का? ।।धृ0।।
का विकसी गायीला कसाबा,असा भिकारी झाला का ?
दारु-जुवाबाजी रे करुनी, कुणी तरी उध्दरला का? ।।१।।
बैलाला ढोससी तुतारी, आत्मा त्यांचा कळला का ?
तसाच ढोसिल देव तुलाही मंत्र न अजुनी कळला का? ।।२।।
गरिबांना नच अन्न जरा दे, यश संसारी येइल का?
तुकड्यादास म्हणे तुज मनुजा ! देव अंति सुख देइल का? ।।३।।