आदर्शाची मिरासदारी, लाखातुनि एका मिळते
(चाल; असार जीवित केवळ माया...)
आदर्शाची मिरासदारी, लाखातुनि एका मिळते ।
कितितरि आपत्ती नि संकटे साहुनिया मग ती कळते ।।धृ0।।
आदर्शाचा पुरा अनुभवी, टिके न गादीवर केव्हा ।
कष्ट करुनिया त्यागाने तो,मरोनिया उजळीत दिवा ।।
विरोधकांची संख्या मोठी, एखाद्याला ही फळते ।
कितितरी आपत्ती नि संकटे ।।१।।
आदर्शाचे पूज्य पुढारी, आले या भारतदेशी ।
लोक विसरले त्यांच्या वचना,अशीच ही जनता हौशी।
समाजसेवेकरिता त्यांचे, हृदय सदाची हळहळते ।
कितितरी आपत्ती नि संकंटे ।।२।।
मेला की मारला कळेना, म्हणती वैकुंठा गेला ।
कितितरी वेळा घात असा सुजनांचा अमुच्याने झाला।।
पुढे नसावी प्रथा अशी ही, म्हणोनिया मन तळमळते ।
कितितरि आपत्ती नि संकटे ।।३।।
गाव असो की रव असो, नीतीने आता जत्तन करा ।
मागिल दोषा विसरुनि सारे, व्हा निर्मळ सत्संग धरा ।।
तुकड्यादास म्हणे ते फेका, ज्या योगे जनता जळते ।
कितितरि आपत्ती नि संकटे ।।४।।