कशी रे उलटी धरिली धुरा ?

(चाल: तुझी रे सारी उलटी तऱ्हा...)
कशी रे उलटी धरिली धुरा ? 
सत्य - पथाची सोडूनि प्रीती ।
धरिली     हृदयी    सुरा ।।धृ0।।
शिक्षित सारे मित्र  तुझे  ते ।
सुंदर-गुणिजन-तरुण असे जे ।
शिकवुनि त्यांना वाईट व्यसने ,
करिसी   जीवन     चुरा  ।।१।।
राष्ट्र तुझ्यावर भिस्त ठेवते ।
तरुण शिपायी तू म्हणुनी ते ।
तुझ्या भोवती का अवगुण ते ।
समजुनी      घेई    पुरा  ।।२।।
उठ जागा हो भोवती बघ हे ।
शत्रूसम तुज पाहत जग  हे ।
तुकड्यादास म्हणे ऐकेना -
निर्मल      हो    नरविरा ।।३।।