मंडळींनो ! लाजू नका पुढ जायला
(चाल: मैत्रिणिंनो ! सांगू नका...)
मंडळींनो ! लाजू नका पुढ जायला ।।धृ0।।
नका विचारु हाशी- खुशी ।
बोलू नका हो कोणापाशी ।
राहता का अजुनिया तशी ?
रानाळ, भूताळ म्हणती कशी !
शेतकऱ्यांची आली वेळा ।।१।।
वेडा - गबाळ संबोधिती ।
हसुनी हिणवित अपमानिती ।
गरिबांवरि करी मौजा किती ।
कष्टाचे पैसे लुबाडिती ।
निसर्गाने आता भाव आला ।।२।।
मंत्र समजला समानतेचा ।
तुटला फासा खुळेपणाचा ।
छंद धरा रे सत् - कार्यांचा ।
शिका पाठ हा मानवतेचा ।
तुकड्या म्हणे आनंद झाला ।।३।।