का म्हणता अबला तिला ?

(चाल: आकळावा प्रेमभावे...)
का म्हणता अबला तिला ? ती शक्तिशाली नाहि का ?
देश अबलेचा कि तुमचा ? सार हा कुणि पाहि का ?।।धृ0।।
माहेरा    पासोमि     तिजला, डांबले    गोशातचि ।
शिक्षणाचा लेश ना, तिज जगचि माहित राही का ?।।१।।
का अशी दैना तिची? तिज बुध्दि नच का जन्मिया ?
अबला करोनी शेवटी,तिज जात तरि सांभाळि का ?।।२।।
कितीतरी विधवा, कुमारी, गायिपरि विकता तुम्ही ।
वाहवारे धर्म हा, अजुनीही    तैसा    राहि    का ? ।।३।।
लोकहो ! शिकवा तिला, जगण्यास जीवनाची कला ।
पुरुषाहुनी ती थोर होईल, पाहिजे अशी ग्वाहि का ?।।४।।
काय कमी देवे दिले, तिज मानवाहूनि सांगना ? ।
आपुली सेवा  कराया, ठेविली    तर   नाही   का ? ।।५।।
बाईनी ! अबला म्हणे कुणी, धरूनि त्याच्या मनगटा ।
तुकड्या म्हणे सांगा तया, तुज जन्म फुकटचि होई का ? ।।६।।
                            - दिल्ली -रेल्वे, दि. 0७-११-१९५५