अहो मंदीरवाल्यांनो ! भाविका जागवा आता
(चाल: मराठे शूर वीरांनो...)
अहो मंदीरवाल्यांनो ! भाविका जागवा आता ।
करा कर्तव्य-तत्पर ते, देऊनी भक्तिची संथा ।।धृ0।।
सावता शेतिवर जातो, मुखाने विठ्ठला गातो ।
निपजवी तो मुळा-भाजी, हर्ष त्या पंढरीनाथा ! ।।१।।
पुंडलिक भक्त तव झाला,तोषवी आईवडिलाला ।
देव पाहण्यास जव आला, हर्षला कार्य ते बघता ।।२।।
जनाई गोवरी वेची, गोरोबा घडवितो मडकी ।
देव उचलावया ओझे, धावतो चोखया येता ।।३।।
हाचि उपदेश सर्वांना, करा निर्माण कार्यासी ।
म्हणे तुकड्या भक्ति ऐसी, आवडे पंढरीराया ।।४।।