भक्तीभावाने तुजपासी, आलो मी घनश्याम
(चाल: मे एक छोटासा बच्चा हूँ...)
भक्तीभावाने तुजपासी, आलो मी घनश्याम ।
जरा तरी भेट मशी 0।।धृ0।।
अवघड हा भवसागर सगळा, तरण्या दुस्तर वाटे ।
कामक्रोध - मद् मत्सर चावती, जिवा बोचती काटे ।
म्हणुनी तव नामी मन रंगे, दिसे न कोठे धाम । जरा 0।।१।।
सत्संगाची नाव मिळेना, बसुनि जरा तरि जावे ।
स्वार्थाच्या अंधारी देवा ! काय किती भटकावे ?
ऐसे जन्म किती घालावे ? सहन होइना राम ! जरा 0।।२।।
वेदशास्त्र-संहिता पुराणे, वाचुनिया मन भ्रमले ।
तुकड्यादास म्हणे गुरुवाचुनि, व्यर्थ जिवन हे गेले ।
बेडा पार करी करुणेने, दे चरणी विश्राम । जरा 0।।३।।