निघु दे दिवस मंगल तो, बाघाया भारता !

(चाल: संदेशा पूज्य गांधी का...)
निघु दे दिवस मंगल तो, बघाया भारता ! तुजला ।अवकळा लोपुनी सारी, मिळो सुखशांती सकळाला ।।धृ0।।
राष्ट्र   बलवान   हो   रक्षो, 
सदा अपुल्या स्वराज्यासी । 
पूर्णता लोकशाहीची, भुकेला जीव  बघण्याला ।।१।।
मिटो अस्पृश्यता सगळी ।
कळो   मानव्यता  समता ।
भेद‌ श्रीमंति-गरिबीचा, न भासो भावि कोणाला ।।२।।
कळो चारित्र्यता सगळ्या,
नीति   जी   रामराज्याची ।
नष्ट हो दुर्व्यसन आता, मिळो उद्योग जनतेला ।।३।।
भिकारी ना दिसो कोणी,
आळसी ना असो कोणी ।
मिळो बहुमान मातांना, जसा देशात  पुरुषाला ।।४।।
दु:खवो ना कुणी केव्हा,
भावना अन्य धर्माच्या ।
प्रीय आपुल्यास तो जैसा,प्रीय हो अन्य सकळाला ।।५।
दृष्ट, खल, गुंड, छल - द्वेषी,
म्हणे तुकड्या नसो आता ।
न्याय-सत्ता बघो त्यांना, मनोभ्रम दूर  करण्याला ।।६।।