बंधुनो ! प्रार्थने चला, जागू या
(चाल: तू येशिल केव्हा तरी...)
बंधुनो ! प्रार्थने चला, जागू या, अपुल्या माणुसकिला ।।धृ0।।
सुखशाति व्हावया जना ।
करु भाव धरूनि प्रार्थना ।
हा विश्वधर्म आपुला । जागु या 0।।१।।
किति पंथ भिन्न जाहले !
येणेचि राष्ट्र नाशले ।
हा मिटवु अता गलबला । जागु या0।।२।।
अम्हि सर्व एक होउनी ।
जातीय वृत्ति सोडुनी ।
वाढवू गुणांची कला । जागु या0।।३।।
जो सकल जगा निर्मिता,
लाभण्या मंत्र सत्यता ।
हा बोध ऐकण्या खुला । जागु या0।।४।।
तुकड्याचि हाक ऐकण्या ।
सुखदुःख प्रभुस सांगण्या ।
हा वेळ भला लाभला । जागु या 0।।५।।