मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांनो जाउया
(चाल: चला बाई पांडुरंगे पाहू वाळवंटी...)
मंडळाच्या प्रार्थनेला, सेवकांनो जाउया ।
भेदभाव सोडविण्या, सर्व गावा लावुया ।।धृ0।।
कोणि ना अमीर अता, कोंणि ना गरीब ।
सर्व होउ भारताचे हाचि धरु भाव ।
काम करु, पोट भरु, हाचि मंत्र सांगूया ।।१।।
कोण हरीजन अता, कोणता ब्राह्मण ?
कोण मराठा नि अता, कोण इतर जन?
मानवांचा धर्म एक गाउया नि पाहुया ।।२।।
लहान लहान वीर, करु साजिरे शिपायी ।
देशासाठी लढायाची, झाली त्यांना घाई ।
धीर देऊ, पाठी राहू, शक्ति युक्ति यावया ।।३।।
पूज्य गांधी आम्हासाठी, जाहले अर्पण ।
राहिलेले काम करु, सर्वही आपण ।
दास तुकड्याची आशा,पूर्ण करुनि दावुया।।४।।