भारतियांनो ! गोवंशाची शक्ती, प्रीति विसरला का !
(चाल: अवताराचे कार्य कराया...)
भारतियांनो ! गोवंशाची शक्ति, प्रीति विसरला का ! ।।धृ0।।
गायींचे उपकार म्हणोनी,
जिवंत तरि आपण अजुनी ।
फेड म्हणोनी वधण्या तिजला,कसाब हाती धरला का ? ।।१।।
लाखो गायी कत्तल होती,
उरतिल का शेतीसाठी ?
बैल कशाचे मिळती तुम्हा,विचार तरि हा उरला का ? ।।२।।
देश आपुला गोवंशावर,
शेतीवर जगला फुगला ।
गायी बैल जव नष्टचि होतिल, शेतकरी मग तरला का ? ।।३।।
पाळुनि अपुल्या घरी गायिला,
दूध - दही द्या मुली - मुलां ।
निपज करा उत्तम बैलांची, मार्ग असा अंतरला का ? ।।४।।
दया न ये तरि लाज वाटू द्या,
गायि कसाबा देउ नका ।
तुकड्या सांगे शेति बुडाली, गर्व न अजुनी जिरला का ? ।।५।।