मना भासे गजानन ! हा, खरा अवतार देवाचा

 (चाल : लगाले प्रेम ईश्वरसे... )
मना भासे गजानन ! हा, खरा अवतार देवाचा ।
कराया कार्य जनतेचे, प्रगटला मानवी   साचा ।।धृ0।।
कुठे श्रीकृष्ण ! होऊनी, कुठे  श्रीराम   होऊनी ।
कुठे नरसिंह ! होऊनी, प्रगटतो  नाथ  प्रेमाचा ।।१।।
कुठे ज्ञानेश गुरू ! झाला, कुठे तुकया ! म्हणो आला ।
कुठे शेगावी अवतरला, असा अवतार क्रम त्याचा ।।२।।
कुठे तो विश्वची नटला, कुठे सोंदर्यवत्‌ झाला ।
तयाची अगम्य ही लीला, कथाया खुंटते वाचा ।।३।।
म्हणे तुकड्या प्रभू भक्ता, न भासे भेदची पहाता ।
तयाची सर्वची सत्ता, हरी नटला   गमे   साचा ।।४।।