धन्य धन्य श्रीसंत गजानन ! शेगावी प्रगटले
(चाल : धन्य धन्य ये स्फूर्ति तन्मये...)
धन्य धन्य श्रीसंत गजानन ! शेगावी प्रगटले ।
अनुभवे येती जगाला भले ।।धृ0।।
देही असुनी विदेह स्थितिचे, दाखवती दाखले ।
पाहता जन नेत्री चागले ।
अपूर्व योगी परमहंस हा, पाहता मन रंगले ।
सोडू ना वाटतसे पाउले ।
(चाल) शेगाव नगर दुमदुमे जशी पंढरी ।
जन अफाट येती भाविक बारी करी ।
राजे महाराजे लोळति चरणावरी ।
नग्न दिगंबर योगिराज ! हे सद्भक्ता पावले ।
अनुभवे येति जगाला भले ।।१।।
लहर ज्यावरी झाली कृपेची, सुदैव त्या लाभले ।
अवकृपे वंश नाश पावले ।
तीर्थ-प्रसादे मरणोन्मुख जे,ते रोगी उठविले ।
औषधीविना सिद्धि पावले ।
शब्दमुखांतुनि निघे जणूं ते, देवि बाण सोडले ।
सत्यची होति न कधिही ढळे ।
(चाल) सामर्थ्य जयाचे अगाध वाटे किती ।
अग्नीविण चिलिमीमधीं धूर काढिती ।
जन असंख्य ऐशा लीलेला पाहती ।
सद्भक्तांना ब्राह्मणरुपे, क्षेत्री दर्शन दिले ।
अनुभवे येति जगाला भले ।।२।।
पाण्याविण एक विहिर कोरडी,पाणी न लागे तिला ।
संत हा अचूक ते लाभला ।
कृपादृष्टिने लहर फिरविता, ओहटा तें पावला ।
झरा बाहेरि वाहू लागला ।
जला बंब ते विहिर कोरडी, खूष धनी जाहला ।
करी लोटांगण पायी भला ।
(चाल) धन्य हा औलिया ! विदेह जनकापरी !
राहतो कुठेहि खातो चुन भाकरी ।
जाऊन पाणी पीतसे नालियावरी ।
अनासक्त हा जगती राही, लोक पाहती खुले ।
अनुभवे येति जगाला भले ।।३।।
जरा द्रोह ना मनी, मारती मुले ऊस घेऊनी ।
हासती धन्य धन्य म्हणवुनी ।
छळती नानापरी लेकरे, अति उर्मट होऊनी ।
जरा ना क्रोध तयाचे मनी !
खेळति कुस्ती धावुनि पोरे, कठिणचि वज्राहूनी ।
भासले संत गजानन मुनी !
(चाल) हरुनिया गर्व तें पायी सर्व लोळती ।
किती तरी कीर्ति ही त्यांची दिंगताप्रती ।
काय मी सांगू हो ! न चाले माझी मती ।
तुकड्यादास म्हणे संताचे, अतर्क्य गुण नांदले ।
अनुभवे येति जगाला भले ।।४।।