मोहना ! यदूनंदना ! कमललोचना !
मोहना ! यदूनंदना ! कमललोचना ! पहा तरी नयना ।
या भारताची ही कशी रे दैना ! ।।धृ0।।
हतभागि तरुण येथीचे, जाहले कुचकामाचे ।
ना घरचे परि परक्यांचे, अपूले न कधी देशाचे ।
लोळती आळशापरी दारि आणि घरी,कशाची करुणा ?
अन्नान्न देश जाहला पहा मनमोहना ! ।।१।।
स्वहितास नोळखी कोणी, नच कर्म-धर्म कुणि मानी ।
ना घेति नीतिला कानी, पळतात सदा अडरानी ।
हा असा तमाशा कसा? वाढली नशा, यत्न समजेना,
कल्पनाच नुरली काहि आजच्या तरूणा ।।२।।
घरदार आळसापायी, गमविले मालकी नाही ।
व्यसनात गुंग मति राही, ऐकिना कुणि कवणाही ।
नच मान-पान राहिला,उगा गलबला भ्रमवितो प्राणा,
अति धिंगाणा हा मना न बघवे नयना ।।३।।
ऐश्वर्यवान बहू होते, पूर्विच्या काळचे जन ते ।
धन-धान्य पेविंही जेथे, नच अन्न खावया तेथे ।
गर्जती वीर चहुकडे, कुणाचे अडे, पडेना काना,
का वेळ अशी पातली आज मनमोहना ! ।।४।।
सावरी आपल्या देशा, हे करुणाघन करुणेशा ! ।
येवढी पुरविना आशा, दे बुध्दि जना जगदिशा ! ।
हे सर्व मिळोनी असो, द्वेष मुळि नसो कुणाचा कोणा,
तुकड्याची ऐकूनि हाक भीक दे कान्हा ! ।।५।।